वसंत माधव कुळकर्णी, सोमवार, २० फेब्रुवारी २०१२ shreeyachebaba@gmail.com बँकांच्या कर्जाचे प्रमाण ठेवीच्या ७५ टक्क्यांएवढे झाले आहे. याच काळात बँकांची कर्जे १६.४% तर ठेवी १५.७% ने वाढल्या (रिझर्व बँकेच्या २७ जानेवारी २०१२च्या सांख्यिकीप्रमाणे) आहेत. याचा अर्थ बँकांना तरलतेचा अभाव जाणवत आहे. या सद्य परिस्थितीचा अन्वयार्थ लावायचा म्हटला तर येत्या दोन तीन दिवसांत अध्र्या टक्क्यांची कपात केल्याची घोषणा कधीही होऊ शकते असे वाटते. हे जर झाले तर बँकांचे समभाग इथून १०-१२% वर जातील.. नुकताच निवडणुकीचा हंगाम शमला. निवडणुकांच्या सभांमध्ये त्या पक्षाचा ज्येष्ठ नेता सगळ्यात शेवटी बोलतो. मग ते बाळासाहेब असोत किंवा शरद पावार असोत. ही प्रथा स्टेट बँकेने पाळली आणि आपल्या ज्येष्ठत्वावर शिक्कामोर्तब केले. सगळ्यात शेवटी निकाल जाहीर केले. बँकेचे चालू आíथक वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेप्रमाणे चांगलेच लागले. व्याजाच्या उत्पन्नात ६.९८% वाढ नोंदवत रु. २०,२१३ कोटींवर गेले तर निव्वळ नफा रु. ३,२६३ कोटींवर गेला आहे. वाढलेला नफा हा मुख्यत्वे अनुत्पादित कर्जापायी करावी लागणारी तरतूद कमी केल्यामुळे निव्वळ नफा वाढला आहे. गेल्या शुक्रवारी स्टेट बँकेचा बंद भाव रु. २१७१.९० होता तर या शुक्रवारी तो रु. २४१७.०५ होता. निकाल जाहीर झाल्यापासून स्टेट बँक १०.२% वर गेला आहे. फक्त पाच दिवसांत हे घडले आहे. खरे तर या स्तंभाची सुरुवात स्टेट बँकेवरच्या लेखाने झाली होती आणि प्रस्तुत लेखक सतत स्टेट बँकेचा भाट असल्याप्रमाणे जागर का करतो आहे ते यावरून ध्यानी येईल. म्हणून हा समभाग आपल्या एकूण गुंतवणुकीचा २-५% हवा. रिझर्व बँकेने १७ फेब्रुवारी रोजी रु. १०,००० कोटींचे सरकारी रोखे खुल्या बाजारातून (Open Market Operations - OMO) खरेदी करणार आहे. गेल्या १२ आठवडय़ातील ही खरेदीची १०वी वेळ आहे. तर सीआरआर अध्र्या टक्क्याने कमी केल्यानंतरची ही दुसरी वेळ आहे. तर २४ नोव्हेंबर २०११ पासून रिझर्व बँकेने एकूण रु. ८२,००० कोटींची खरेदी केली आहे. सीआरआर कमी केल्यामुळे खुले झालेले रु. ३२,००० कोटी जमेल धरल्यास एकूण रु. १,१२,००० कोटींची तरलता वाढविणारे सहाय्य रिझर्व बँकेने वाणिज्य बँकांना दिले आहे. आंतरबँक व्याजाचा दर ह सतत रेपोदराच्या वर चालू आहे. आंतरबँक तरलता (रेपो-रिव्हर्स रेपो) ही नोव्हेंबरपासून वाढतच आहे. बँकांच्या कर्जाचे प्रमाण ठेवीच्या ७५ टक्क्यांएवढे झाले आहे. याच काळात बँकांची कर्जे १६.४% तर ठेवी १५.७% ने वाढल्या (रिझर्व बँकेच्या २७ जानेवारी २०१२च्या सांख्यिकीप्रमाणे) आहेत. याचा अर्थ बँकांना तरलतेचा अभाव जाणवत आहे. या सद्य परिस्थितीचा अन्वयार्थ लावायचा म्हटला तर येत्या दोन-तीन दिवसात अध्र्या टक्क्यांची कपात केल्याची घोषणा कधीही होऊ शकते असे वाटते. हे जर झाले तर बँकांचे समभाग इथून १०-१२% वर जातील. रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली वीजनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी पंतप्रधांना भेटले होते. त्या दिवसापासून वीजनिर्मिती कंपन्यांचे समभाग वधारत आहेत. या क्षेत्राला आगामी अर्थसंकल्पात काही सवलती मिळतील असे वाटते. या क्षेत्राविषयी या स्तंभातून यापूर्वी लिहिले आहे. या वर्षी अन्नधान्याचे उत्पादन २५ कोटी टन अपेक्षित आहे. ही वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत ६.५०% जास्त आहे. शेअर बाजाराच्या दृष्टीने ही आनंददायक बातमी आहे. तर कच्च्या तेलाचे भाव नायमॅक्स वर १०२.३५ डॉलर / पिप असणे ही चांगली गोष्ट नाही. इराणविषयक अमेरिकेचे धोरण भारताला त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. सध्या भारत एकूण तेलाच्या आयातीच्या १५% तेल इराणकडून घेत आहे. एका बाजूला आíथक तुटीबद्दल चिंता व्यक्त करायची दुसऱ्या बाजूला ही परिस्थिती हाताळण्यासाठी प्रत्यक्ष ठोस पावले उचलायची नाहीत असे सरकारचे धोरण आहे. उदाहरणादाखल बोलायचे तर प्रत्यक्ष कर संहिता २०११ (Direct Tax Code) ही १ एप्रिल २०१२ पासून लागू व्हायला हवी होती. परंतु प्रशासकीय प्रक्रियेत झालेल्या दिरंगाईमुळे ती लागू होऊ शकणार नाही. सध्याच्या भारतीय प्राप्तिकर कायदा १९६१च्या ऐवजी हा नवीन कायदा लागू होणार आहे. जुन्या कायद्यातील त्रुटी दूर करून नवीन कायदा अस्तित्वात यायचा आहे. हा कायदा अस्तित्वात आल्यामुळे सरकारला १०,००० ते १२,००० कोटी अधिक कर गोळा झाला असता. यंत्रामध्ये कुठलेही दोन फिरणारे भाग एकमेकाला घासतात त्यामुळे त्या ठिकाणी घर्षण होते. हे घर्षण कमी करण्याचे एक उपकरण फिरणाऱ्या भागांच्या मध्ये बसविले जाते त्या उपकरणाला बेअरिंग असे म्हणतात, या उपकरणाच्या निर्मितीत माहीर असणाऱ्या एसकेएफ इंडिया लिमिटेड या कंपनीची ओळख करून घेऊ. अनेक वाचकांनी जुन्या मुंबई- पुणे रस्त्यावर चिंचवड येथे ही कंपनी पहिलीदेखील असेल. परंतु या कंपनीचे उत्पादन औद्योगिक उत्पादन असल्यामुळे अभियंत्यांव्यतिरिक्त इतरांना या कंपनीच्या उत्पादनाची फारशी माहिती कदाचित नसेल. एसकेएफ इंडिया लिमिटेड एसकेएफ इंडिया लिमिटेड (एसकेएफ) या कंपनीची स्थापना १९६१ साली एसकेएफ (Svenska Kullager fabriken AB), स्वीडन या १९०७ सालापासून बेअरिंगच्या व्यवसायात असणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपनीची भारतीय उपकंपनी म्हणून करण्यात आली. मूळ स्वीडिश कंपनीच्या अनेकानेक उपकंपन्या आणि संयुक्त प्रकल्प आज १७० देशांत कार्यरत आहेत. वेगवेगळ्या प्रकारची बेअरिंग्ज ही कंपनी बनविते. आपल्या घरातील छताला अडकवलेला पंखा किंवा कपडे धुण्याचे यंत्र, सायकलचे हॅन्डल, इथपासून ते विद्युतनिर्मिती करणाऱ्या जनित्रापर्यंत ज्या ठिकाणी यंत्राचे फिरणारे भाग असतात त्या ठिकाणी घर्षण कमी करण्यासाठी बेअरिंग्ज वापरात येतात. वाहन उद्योग, वीजनिर्मिती, पोलादनिर्मिती, सीमेंट उद्योग, वस्त्रनिर्मिती, यंत्रसामग्री, विमाने, बांधकाम क्षेत्र, रेल्वे खाण उद्योग आदी सर्व ठिकाणी या कंपनीची उत्पादने वापरली जातात. थोडक्यात यंत्र चालविण्यासाठी जेवढी विजेची गरज असते तेवढीच बेअरिंग्जची गरज असते. कंपनीने आपला व्यवसाय बेअरिंग्ज व्यतिरिक्त इतर चार प्रकारच्या उत्पादनांत विभागला आहे. बेअरिंग्ज विक्रीच्या व्यवसायातून ८५% तर इतर सेवांच्या विक्रीतून कंपनीला १५% उत्पन्न मिळते. घर्षण प्रतिबंधक सेवा, घर्षण प्रतिबंधक उत्पादने, सील (ज्या ठिकाणी घर्षण प्रतिबंधासाठी वंगण वापरले जाते त्या ठिकाणी वंगण बाहेर पडू नये म्हणून वापरायाची बुचे), घर्षण प्रतिबंधक प्रकल्प (ज्या ठिकाणी कंपनीची सध्याची उत्पादने वापरू शकत नाही अशा ठिकाणी घर्षण प्रतिबंधासाठी विकसित केली जाणारी उत्पादने, उदाहरणार्थ पाणबुडी, चांद्रयान, अणुप्रकल्प इत्यादी) असे या चार प्रकारांमध्ये या व्यवसायांचे वर्गीकरण कंपनीने केले आहे. या पाचही प्रकारात ही कंपनी आपले नेतृत्व टिकवून आहे. कंपनी आपली बेअरिंग्ज मुख्यत्वे वाहन उद्योग आणि यंत्रसामग्री (MachineTool) या उद्योगांना पुरवठा करते. या दोन्ही उद्योगांचा एकूण उलाढालीतील वाटा ५०% आहे तर ७०% विक्री ही यंत्रनिर्मिती उद्योगांना (Original Equipment Manufacturer) तर ३०% यंत्र आणि वाहनांचे नादुरुस्त भाग बदली करताना सूटे भाग या स्वरूपात होते. कंपनीचे सहा कारखाने चिंचवड-पुणे (२), बंगळुरू, अहमदाबाद, हरिद्वार, म्हैसूर इथे आहेत. हरिद्वार येथील कारखाना दुचाकी वाहनांना लागणाऱ्या बेअरिंग्जसाठी उभारण्यात आला तर अहमदाबाद येथील कारखाना वीजनिर्मिती प्रकल्पांसाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रांसाठी लागणाऱ्या बेअरिंग्जची निर्मिती करतो. हा कारखाना एसकेएफचा भारतातला सगळ्यात मोठा कारखाना आणि नवीन कारखाना असून २००९ साली येथे उत्पादनास प्रारंभ झाला. या कंपनीची उत्पादने वाहने आणि यंत्रसामग्री उद्योगात वापरात असल्यामुळे या कंपनीची विक्री या दोन उद्योगांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. गेल्या पाच-सहा तिमाहीत चढय़ा व्याजदराचा विपरीत परिणाम या दोन उद्योगांवर झाला. देशाच्या बदलत्या आíथक धोरणामुळे व्याजदर खाली येत असून याचा सकारात्मक परिणाम एसकेएफच्या विक्रीवर दिसू लागेल. एसकेएफने हीरो मोटोकॉर्प या दुचाकी वाहनांची निर्मिती करणाऱ्या कंपनीशी करार केला आहे. या करारानुसार २००९-२०१४ या कालावधीत या दुचाकी वाहनात फक्त एसकेएफचीच बेअरिंग्ज वापरण्यात येतील. पुढील तीन वर्षांत एसकेएफ रु. ८०० कोटी खर्च करून तीन कारखाने उभारणार आहे. हे रु. ८०० कोटी कंपनी गंगाजळीतून खर्च करणार आहे. म्हणजे बाजारातून नवीन कर्ज अथवा हक्कभाग विक्री यातून ते उभारण्यात येणार नाहीत. कंपनीबद्दल आकर्षणाचे एक कारण म्हणजे तिच्या ताळेबंदात एका नव्या पशाचेही कर्ज नाही. यात म्हैसूर कारखान्याचा विस्तार, अहमदाबाद येथील कारखान्याचा विस्तार आणि दक्षिण कर्नाटकात एका नवीन ठिकाणी (जागेचा शोध चालू आहे) कारखाना उभारण्यात येणार आहे. हा कारखाना तामिळनाडूतील वाहननिर्मिती उद्योगांच्या (ह्यूंडाई, फोर्ड, टफे, अशोक लेलँड) व कोईम्बतूर येथील यंत्र उद्योग यांच्या गरजा भागवण्यासाठी उभारण्यात येणार आहे. बेअरिंग्ज हा अतिशय महागडा सुटा भाग आहे. म्हणून त्याची आगाऊ साठवण करून ठेवली जात नाही. जेवढी गरज तेवढीच ती आणली जातात. वाहन उद्योगात एके दिवशी समजा पाच दिवस पुरेल एवढा टायरचा साठा असेल तर बेअरिंग्जचा साठा एका दिवसाचाच असतो. त्यामुळे वाहननिर्मिती करणाऱ्या कारखान्याजवळ बेअरिंग्जचा कारखाना असावा लागतो. पहिला कारखाना पुण्यात चिंचवड येथे काढला. कारण टाटा मोटर्स आणि बजाज ऑटो हे दोन कारखाने जवळ आहेत. वर्ष २०१० (कंपनीचे आर्थिक वर्ष जानेवारी-डिसेंबर असे आहे) मध्ये २०६८ कोटींच्या विक्रीवर १७७ कोटींचा निव्वळ नफा कंपनीला झाला आहे. गेल्या पाच वर्षांत कंपनीची विक्री सरासरी २८% दराने वाढत आहे. या कंपनीमध्ये प्रवर्तकांचा हिस्सा ५३.३८% आहे. आपल्या समभागातील गुंतवणुकीच्या ०.७५ ते १.००% एवढे समभाग या कंपनीचे हवेत. पुढील वर्ष दीड वर्षांत २०-२५% भाववाढ अपेक्षित आहे. या समभागात तरलता कमी आहे. गेल्या तीन महिन्यांत रोजचे सरासरी १६,४०० समभागांचे सौदे झाले आहेत. |
No comments:
Post a Comment